प्रकरण-12
प्रवासी सामान
वाहतुकीचे / हमालीचे दर
प्रवाशांना प्रवासादरम्यान सामानासह
प्रवास करणे आवश्यक असते व तशी मुभा महामंडळाकडून देण्यात आलेली आहे.
प्रवाशांना त्यांच्या सामानाची
बसस्थानकावरील वाहतूक व सामानाची
बसवरील चढ-उतार सुलभ, सुकर व्हावी
याकरिता महामंडळाने बसस्थानकांवर
भारवाहक / हमाल यांची नियुक्ती केलेली
आहे व हमालीचे दर निर्धारित करण्यात
आलेले आहेत.
प्रौढ प्रवाशास प्रति प्रवासी 20
कि.ग्रॅम तर 5 ते 12 वयोमान असणाऱ्या
मुलांकरिता 10 कि.ग्रॅम इतक्या वजनाचे
सामान विनामूल्य सोबत घेऊन जाता येते.
मात्र यापेक्षा जास्त वजनाचे सामान
सोबत नेण्यासाठी पुढील प्रत्येक 20 कि.ग्रॅम किंवा त्याच्या भागास 6 कि.मी.
च्या एका टप्प्यासाठी 30 पैसे आकार
द्यावा लागताे.
सूट वजा जाता प्रवाशांकडील सामानाचे
वजन 20 कि.ग्रॅम पेक्षा जास्त असेल व
अशा प्रवाशाचा प्रवास 240 कि.मी.
पेक्षा जास्त व 480 कि.मी.पेक्षा कमी
असेल, तर अशा प्रवाशांकडून सरसकट
जास्तीत जास्त रु.12/- व 480 कि.मी.
पेक्षा जास्त प्रवास असल्यास सरसकट
जास्तीत जास्त रु.18/- सामान वाहतूक
आकार वसूल करण्यात येतो व किमान आकार
रु.1/- इतका आकारण्यात येतो आणि सामान
भाडे रुपयाच्या पटीत करण्यात येते.
14' आकारमानाच्या दूरदर्शन संचासाठी
एका प्रौढ प्रवाशाच्या प्रवास भाडे
दराइतकी रक्कम सामान आकारापोटी वसूल
करण्यात येते. तर 22', 24' आणि 29'
आकारमानाच्या दूरदर्शन संचाकरिता दोन
प्रौढ प्रवाशांच्या प्रवास भाडे
दराइतकी रक्कम वसूल करण्यात येते.
भारतीय सैनिक जेव्हा कर्तव्यावरुन
रजेवर घरी येत असतात, अशा वेळच्या
प्रवासादरम्यान त्यांचेकडील 40 कि.ग्रॅम वजनाचे सामान विनामूल्य
वाहून नेण्यात येते. याकरिता सदर
सैनिक अधिकृत रजेवर असल्याबाबत
संबंधित कमांडींग ऑफिसरचा दाखला
त्याच्या जवळ असणे आवश्यक आहे.
प्रवासी सामान वाहतुकीबाबतची नियमावली
(1) प्रवाशास प्रवासादरम्यान सामान वाहतूक
करावयाची झाल्यास इंडियन कॅरिअर ऍक्ट
1965 मधील तरतुदींचे पालन करणे आवश्यक
आहे. प्रचलित कायद्यान्वये प्रतिबंधित
केलेल्या सामानाची वाहतूक करता येणार
नाही. नगरपालिकांचे स्थानिक कर /जकात
प्रवाशांना अदा करावी लागते.
(2) प्रवाशास हमालीचा स्वतंत्र आकार
अदा करणे आवश्यक आहे.
(3) नैसर्गिक आपत्तीमुळे सामान
हरवल्यास महामंडळ जबाबदार राहणार नाही.
महामंडळाच्या कर्मचाऱ्याच्या दोषामुळे
सामानाची नासधूस झाल्यास होणाऱ्या
नुकसानीस महामंडळ जबाबदार राहील.
(4) सामानाची बांधणी सुरक्षित
नसल्यामुळे त्याची नासधूस झाल्यास
महामंडळ जबाबदार राहणार नाही.
(5) सामानाचा आकार वसूल
केल्यानंतरसुध्दा सामानाचे पुर्नवजन
करण्याचे अधिकार महामंडळास राहतील व
पुर्नवजनात सामानाचे वजन जास्त
धरल्यास जादा वजनाप्रमाणे आकार
प्रवाशास द्यावा लागेल.
(6) प्रवासी सामान डाग 40 कि.ग्रॅ व
आकारमान 0.75 x 0.5 x 0.5 पेक्षा अधिक
नसावे. प्रवासी सामान स्वीकारण्याचे
हक्क महामंडळाकडे आहेत.
(7) प्रवासी सामानापोटी उचित सामान
वाहतूक आकार वाहकास देऊन त्याची
स्वतंत्र तिकिटे प्रवाशांकडून संबंधित
प्रवाशाने घेणे आवश्यक आहे.