सुधाकरपंत परिचारक
अध्यक्ष (मंत्री दर्जा)
(म.रा.मा.प.महामंडळ मुंबई)
 
 
अध्यक्षांचे मनोगत
 
जून १९४८ मध्ये एस.टी.महामंडळाने प्रवासी वाहतूकीस सुरूवात केल्यानंतर आज ६३ व्या वर्षात पदापर्ण केलेले आहे. “रस्ता तेथे एसटी” या ब्रीद वाक्यानुसार ग्रामीण व दुर्गंम भागात प्रवासी सेवांचा विकास करण्याचे प्रयत्न महामंडळ सातत्याने करीत आहे. ३६ बेर्डफोर्ड बसेसपासून प्रवासी वाहतुक सुरू केलेल्या महामंडळाकडे आज विविध सेवा प्रकारातील १७०००+ बसेस उपलब्ध आहेत. याशिवाय आज २४७ आगार, ३२ विभागीय कार्यशाळा,       ३ मध्यवर्ती कार्यशाळा आहेत. याचा वापर बस बांधणीसाठी व वाहनांच्या मोठ्या प्रमाणावरील दुरूस्तीसाठी व देखभालीसाठी होतो. महामंडळाने ५७८ सुसज्ज अशी बसस्थानके प्रवासी सुविधा अंतर्गत पुरविलेली आहेत. महामंडळाच्या बस सेवामधून दररोज ६३ लाखा पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात.

मी सप्टेंबर २००६ मध्ये महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पुन्हा कार्यभार स्विकारल्यानंतर प्रवासी सेवासुविधांचा आढावा घेतला व महामंडळाच्या बससेवांकडे प्रवासी आकर्षित करण्यासाठी “प्रवासी वाढवा एसटी वाढवा” या अंतर्गत विविध प्रवासीभिमुख योजना अंमलात आणल्या. यास प्रवासी वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मला आपणास कळविण्यात आनंद होतो की, सन २००५-०६ पर्यंत महामंडळाचा असलेला
संचित तोटा रु.११२२.९८ कोटी सन २००९-१० ला रु.३८६.११ कोटी पर्यंत कमी करण्यात महामंडळास यश प्राप्त झालेले आहे. मला आशा आहे की, येत्या २-३ वर्षात महामंडळाचा संचित तोटा पूर्णत: कमी होईल.

संगणकीकरणाचा कार्यक्रम महामंडळाने संपूर्ण राज्यासाठी हाती घेतलेला असून या अंतर्गत इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्युवींग मशिन आणि आँनलाईन रिझर्व्हेशन सिस्टीम या तंत्रज्ञानाचा वापर प्रवाशांना तिकीट देण्यासाठी करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे प्रवासी सुविधांसोबतच महामंडळास बस फेऱ्यांचे नियोजन अधिक कार्यक्षमपणे करता येणार आहे. महामंडळ प्रवासी गरजेनुसार प्रवासी सेवांचा विकास करण्यासाठी तसेच आर्थिक स्थैर्य मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे. प्रवाशांना सुरक्षित, सौजन्यपूर्व व समाधानकारक प्रवासी सेवा देण्यासाठी महामंडळास आपणाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळत राहील याची मला खात्री आहे.

धन्यवाद ! 
 
2010, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.